प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ? Part 2
रोग न होण्यासाठी म्हणून आयुर्वेदात स्वस्थवृत्त, सदवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या, रसायन चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा इत्यादी अनेक उपाय सुचवलेले आहेत.
त्यामध्ये सर्वात पहिला नंबर हा स्वस्थ राहण्याचा म्हणजेच स्वस्थवृत्ताचा लागतो. आता स्वस्थ म्हणजे काय ?
तर स्वस्थ असण्याची खूप सुंदर व्याख्या आयुर्वेदात सांगितली आहे –
समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियः |
प्रसन्न आत्म इन्द्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते ||
दोष, अग्नि, धातू, मलक्रिया या सम राहिल्या पाहिजेत, तसेच आत्मा इंद्रिय व मन हे प्रसन्न राहिले पाहिजेत त्याला स्वस्थ असे म्हणतात.
आता दोष हे ३ प्रकारचे आहेत, वात, पित्त, कफ हे तीन दोष होय. अग्नि १३ (तेरा) प्रकारचे आहेत, त्यातला मुख्य अग्नि म्हणजे जाठराग्नी. ‘अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रीतः’ या भगवंताच्या उक्तीप्रमाणे प्राण्यांच्या शरीरातील अग्नि (वैश्वानर) हा मी (भगवंत) आहे, तो नाहीसा झाला कि शरीर मृत होते. एवढे महत्व त्या अग्नीला आहे, म्हणून अग्नि स्वस्थ राहिला पाहिजे. तो कमी (मंद), जास्ती (तीक्ष्ण), बिघडलेला (विषम) असा असू नये, तेव्हाच आपण स्वस्थ राहू शकतो. धातू हे ७ ( सात) प्रकारचे असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे सात धातू शरीरामध्ये असतात. तेही सुस्थितीत असणे स्वस्थ राहण्यासाठी आवश्यक असते. मल हे मुख्यतः ३ (तीन) प्रकारचे असतात. मल (विष्ठा), मूत्र (लघवी), स्वेद हे तीन मल शरीरातून बाहेर पडतात. यांचेही वेळेवर आणि योग्य प्रमाणात बाहेर पडणे आवश्यक असते.
आता हे झाले शारीरिक पातळीवरचे स्वास्थ्य. पण याच्याही पुढे जाऊन आयुर्वेदामध्ये मन, इंद्रिये आणि आत्मा हेही स्वस्थ आणि मुख्यतः प्रसन्न असायला हवेत असे म्हटलेले आहे. हि विशेष नोंद घेण्यासारखी आहे. कारण आज आपण पाहतो , सर्व तपासण्या नॉर्मल येतात पण त्रास काहीतरी होत असतो, मग ते मनाशी, इंद्रियांशी किंवा आत्म्याशी निगडीत असे त्रास असतात. असे आजचे विज्ञान सुद्धा मान्य करायला लागले आहे, जे आयुर्वेदात पाच हजार वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे कि वरील सर्व योग्य व स्वस्थ असेल त्याला स्वास्थ्य म्हणावे.
म्हणून वरील सात गोष्टी (दोष, अग्नि, धातू, मलक्रिया, आत्मा, इंद्रिय व मन ) स्वस्थ असणे आवश्यक आहेत व त्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असायला हवे.