काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
भाजी ( Vegetables ) – भाग 8
कडधान्य भाज्या
कडधान्याचा वापर भारतीय आहारात रोज केला जातो. त्याच्यातही विविध पद्धतींनी यांचा वापर होतो. यांचा उसळ, आमटी, डाळ, मोड आलेले इ. प्रकारांनी उपयोग केला जातो. या आहारीय पदार्थांचा वापर आयुर्वेदाने अत्यंत चपखलपणे केला आहे. ही कडधान्ये कशी खावी, कशाबरोबर खावी, कधी खावी, व किती खावी याबद्दल काही सूचना केल्या आहेत त्या खालील प्रमाणे –
– कडधान्ये पचायला अत्यंत जड असतात. त्यामुळे भूक चांगली असतांनाच यांचा वापर केलेला बरा.
– उसळ ही आमटी पेक्षा पचायला जड होय. म्हणून भूक कमी असलेल्यांनी आमटीचा वापर करावा.
– कडधान्ये ही रुक्ष म्हणजे कोरड आणणारी असतात म्हणून यांच्या बरोबर नेहमी तेल किवा तूप यांचा वापर जरूर करावा.
– गसेस, असिडीटी इ.च्या तक्रारी असणाऱ्यानी कडधान्ये नेहमी वापरू नयेत. किवा आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्यानेच वापरावीत.
– तसेच मलावरोधाची तक्रार असणाऱ्यानीही खाऊ नये.
– डोळ्यांसाठी हानिकारक म्हणून चश्मा किवा इतर त्रास असणार्यांनी कमी वापरावीत.
– नुसती किवा कच्ची कडधान्ये खाऊ नयेत. त्यामुळे पोटात दुखणे, गसेस अशा तक्रारी दिसतात.
– मुग, मसूर, मटकी सोडून इतरांचा वापर दररोज करू नये. (उदा. तूर, हरभरा, चणे, छोले इ.) किवा कमी वापर करावा. त्यामुळे पोटात दुखणे, गसेस/ पोटात वायू धरण्याची शक्यता असते. जी मुग इ च्या वापराने इतकी दिसत नाही.
– बैठे काम, व्यायामाचा अभाव इ असतांना कडधान्ये कमी खावेत.
– तक्रारी असतांना कडधान्ये ही पातळ करून व त्यात तूप घालून खावीत.( वैद्याच्या सल्ल्याने)
– सामान्यपणे निरोगी माणसांनी मुग – मसूर यांचा वापर रोजच्या आहारात आलटून पालटून करण्यास हरकत नाही.
– रोगी माणसांनी आपल्याला काय योग्य ते ठरवून मगच खावे.(आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्याने)
– या सारख्या असंख्य सूचना ज्या नेहमी प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी ठरतात अशा आयुर्वेदिय ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या आढळतात.
आरोग्याच्या हितासाठी प्रयत्न केल्यास आपण भाज्या उपलब्ध करून घेऊ शकतो. इच्छा असेल तर सर्व काही मिळू शकते. प्रयत्न करून बघावे कि कुणा शेतकऱ्याकडे अश्या भाज्या उपलब्ध होतात का. विदेशी भाज्या खाण्यापेक्षा असे प्रयत्न नक्कीच फायदेशीर ठरतात.
भाज्यांबद्द्ल आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवूयात.
– क्रमशः
वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
Old articles about vegetables available