12 ते 21) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व, भाग 12 ते 21

12 ते 21) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व, भाग 12 ते 21

12) अर्क  – Calatropis Procera

अर्क म्हणजे रुई होय. आपल्याला शनिवारी मारुतीच्या देवळात रुईची पाने वापरतात एवढाच उपयोग माहिती असतो. पण रुईच्या पानांबरोबर तिची साल,चीक,मुळ, मुळाची साल हेसुद्धा उपयोगी आहेत. 

– रुई तीक्ष्ण व कडक औषधी आहे. त्यामुळे अतिप्रमाणात /अज्ञानाने वापरली गेली तर विषारी आहे. 

– रुईचा चीक वामक तसेच विरेचक आहे त्यामुळे अग्निमांद्य, यकृतविकार, कृमि, जलोदर यासारख्या आजारांत वापरले जाते. 

– सूज असल्यास रुईची पाने गरम करून त्याचे पोटीस बांधले जाते. 

– श्वित्र म्हणजेच कोड रोगामध्ये रुईचा चीक लावतात. 

– त्वचा रोगांत ,सांधेदुखीत , कान दुखत असेल तर आजार व दोषानुसार अर्कतैल हे रुईच्या पानांपासून बनवलेलं औषध वापरतात. अर्क मात्र अधिक मात्रेत घेतले गेल्यास उलट्या,मळमळ,पोटात आग होणे यासारखी  विषारी लक्षणे दिसतात. म्हणून त्याचे इतर उपयोग करताना मात्र आयुर्वेदिक वैद्यांना विचारून करावा म्हणजे त्रास होणार नाही, हा नियम सर्वच औषधांना लागू होतो, नाहीतर आजकाल आपण पाहतोच की अमुक औषधाने अमुक त्रास झाला म्हणून कांगावा चालू असतो.

मंत्र – कपिलाय  नमः । अर्कपत्रं समर्पयामि ।। 

13) अर्जुन – Terminalia  Arjuna

अर्जुन या नावाने सहसा ओळखली जाणारा हा वृक्ष साधारणतः पाण्याजवळ जास्त दिसतो. 

– हा वृक्ष कफ-पित्त शामक आहे. 

– अर्जुनाचे महत्वाचे कार्य हृदयावर होते. हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा नीट – नियमित करणे,त्यांचीही शक्ती वाढवणे यासाठी अर्जुनसाल महत्वाची आहे. 

– खोकल्यामधून रक्त पडत असेल तर अर्जुनचूर्ण  अडुळशाच्या काढ्यासोबत देतात . 

– मूत्रमार्गातील  संसर्ग ,लघवीला होणारी जळजळ यातही अर्जुन उपयुक्त आहे. 

– रक्तस्राव  थांबवण्यासाठी अर्जुन चूर्ण उत्तम आहे. – अर्जुन हे अस्थिसंधानिय आहे म्हणजे तुटलेले हाड जुळवणारे, त्यामुळे फ्रॅक्चर झाले असल्यास साल बाहेरून लावणे व पोटात घेणे अशा दोन्ही प्रकाराने वापरता येते.  

याचा क्षीरपाक पद्धतीने  म्हणजे दुधामध्ये अर्जुन साल चूर्ण उकळून सिद्ध करून पोटात घेण्यासाठी वापरले जाते. 

मंत्र -गजदंतायनमः । अर्जुनपत्रं समर्पयामि ।।

14) विष्णुक्रांता – Evolvulus alsinoides

मराठीमध्ये हिला शंखवली असे म्हणतात.  

– विष्णुक्रांता मेध्य  म्हणजे बुद्धीवर विशेषत्वाने कार्य करणारी आहे.  

– मस्तिष्कदौर्बल्य यावर उपयोगी असल्याने उन्माद ,अपस्मार , झोप न येणे ,नैराश्य अश्या आजारांत वापरले जाते. मात्र हा वापर वॆद्यांच्या सल्ल्यानेच व्हावा. 

मंत्र – विघ्नराजाय  नमः । विष्णुक्रांतापत्रं  समर्पयामि ।।

15) दाडिम – Punica granatum

 दाडिम म्हणजे डाळिंब हे फळ होय. 

– याची गोड फळे मधुरकषाय रसाची मधुर विपाकी असतात ज्यामुळे कफ-पित्ताचे शमन होते. 

– मात्र आंबट रसामुळे फळ पित्तप्रकोपक आहे. 

– यामुळे मधुर फळ हे अरुचि, भूक न लागणे,अम्लपित्त यासारख्या आजारांत पथ्याचे आहे.

– लहान मुलांच्या अतिसारामध्ये डाळिंबाची साल उगाळून देतात. 

– बाळगुटीमध्ये डाळिंबसाल असते. 

– स्फीतकृमि (Tapeworm) संसर्ग झाल्यास डाळिंबसाल उगाळून देतात. 

– डाळिंब हृदयाला अत्यंत हितकर आहे त्यामुळे रक्ताल्पता(anaemia) , हृद्रोग यात डाळिंब जरूर खावे.

– आजारात येणाऱ्या दौर्बल्यासाठी डाळिंब उत्तम पथ्य आहे. 

– तोंड येणे, अल्सर या मुखरोगात डाळिंबसालाच्या काढ्याने गुळण्या करतात.

मंत्र – बटवे नमः । दाडिमपत्रं समर्पयामि ।।

16) देवदार – Cedras deodara

       देवदार हा मोठा वृक्ष आहे. हिमालयात थंड हवेच्या ठिकाणी जाताना, भूगोलाच्या पुस्तकात सूचीपर्णि वृक्षाचे नाव म्हणून देवदार वृक्ष सगळ्यांना माहितीचा असतो.पश्चिम घाट प्रदेशातही देवदार वृक्ष आढळतात.  

– देवदार हा कफ-वातशामक आणि पित्तवर्धक आहे. 

– उत्तम वातशामक आणि वेदनास्थापन (वेदना कमी करणारे) असल्याने याचे तेल संधिवात,आमवात, वेदना असणे, स्रावी त्वचारोग यामध्ये बाहेरुन लावण्यासाठी दिले जाते. 

– उष्ण गुणाचे असल्याने आमपाचन म्हणून उत्तम उपयोगी. 

– त्यामुळे अजीर्ण , अपचन, वातामुळे पोट फुगणे इ असल्यास देवदार चूर्ण वापरतात. 

– उष्ण गुणाचे असल्याने गर्भाशयशोधक आणि तिक्त रसाचे असल्याने स्तन्यशोधक आहे त्यामुळे प्रसुतीनंतर स्त्रीच्या शरीरात वाढलेला वात दोष कमी करण्यासाठी नियमितपणे दिले जाणारे देवदारव्यारिष्ट बऱ्याच जणांच्या परिचयाचे असेल. वात दोषाच्या  वेगवेगळ्या आजारात देवदार हे महत्वाचे औषध आहे.

मंत्र – सुरग्रजाय नमः । देवदारु पत्रं समर्पयामि ।।

17) मारवा – Majorana hortensis

   मारवा कफवातशामक, पित्तवर्धक आहे. 

– मरव्याचा रस किंवा तेल प्रामुख्याने वापरले जाते व लेपासाठी पंचांगकल्क (पान,फूल,फळ ,खोड, मूळ) वापरतात. विषघ्न गुणांचा असल्याने किटकदंशावर लेप केला जातो. 

– व्रणरोपण (जखम भरून येण्यास मदत करणारे) व दुर्गंधनाशन असल्याने जखमेवर रसाचा/तेलाचा लेप केला जातो. 

– कृमिघ्न व वातशामक असल्याने तेल पोटात घेण्यासाठी दिले जाते. 

– पोटात जंत झाल्यास किंवा गैसेसचा त्रास होत असल्यास हे नक्कीच लाभदायक आहे. 

मंत्र – भालचन्द्राय नमः । मरुपत्रं समर्पयामि ।।

18) पिंपळ – Ficus Religiosa

आपल्या सर्वांच्या परिचयाचा हा पिंपळ कफ-पित्तशामक , रक्ताचे शोधन करण्यासाठी उपयोगी आहे. 

– रक्तपित्त आजारात पिंपळ सालीचा काढा मध टाकून देतात. 

– कषाय रसात्मक असल्याने रक्तस्राव , गर्भस्रावाच्या तक्रारीमध्ये वापरले जाते. 

– पंचवल्कल वर्गातील इतर वनस्पतीसोबत सालीचा काढा करून व्रणांचे (जखमेचे) धावन  (स्वच्छ करणे), लेपन करतात ज्यामुळे जखम लवकर भरून येते.

– पिंपळ मूत्रसंग्रहणीय  (म्हणजे वाढलेली मूत्रप्रवृत्ती, Polyuria , कमी करणारे) आहे. त्यामुळे प्रमेह रोगात पिंपळ सालीचा काढा देतात. 

– पिंपळाच्या पानाची भाजीही करतात, बुद्धिवर्धक अशी ही भाजी सर्वांनी अवश्य करून बघावी.

मंत्र – हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।

19) जाति  – Jasminum Officinale

           जाति  म्हणजे जाई/चमेली. 

जाई त्रिदोषहर आहे. 

– जातिपत्र ( पाने ) दंत-मुखरोगनाशक आहे. त्यामुळे दातदुखी, हिरड्यांतून रक्त येणे अश्या त्रासांत जाईची पाने स्वच्छ धुवून चावून चावून थुंकून टाकावीत. 

– भरून न येणाऱ्या घाव-जखमा यावर जाईच्या पानांचा काढा/सिद्ध तैल/सिद्ध घृत वापरले जाते. 

– कर्णरोग ,कानात झालेले जंतुसंसर्ग यामध्येसुद्धा जाईच्या पानांचा उपयोग होतो. 

– काही प्रकारच्या त्वचारोगात जाईच्या मुळाचा  काढा देतात .   

मंत्र – चतुर्भूजाय नमः । जाति पत्रं  समर्पयामि ।।

20) केतकी – Pandanus  odorotissium 

 केतकी म्हणजे केवडा. 

केवड्याचे पान स्त्रियांना केसांत माळण्यासाठी आवडते . केवडा जल, केवडा तेल इ. चा होणारा  वापरसुद्धा आपल्याला माहिती असतो. 

– केवडा त्रिदोषशामक असून विशेषत्त्वाने कफ-पित्तशामक आहे . 

– मस्तिष्क व वातवाहिन्यांना बल्य असल्याने अपस्मार , मस्तिष्कदौर्बल्यजनित आजारांत नस्य किंवा सिद्ध तैल लावतात. 

– दाह कमी करणारे असल्याने शरीराची आग होणे, कांजिण्यांसारख्या विषाणू संसर्गांत होणार दाह , जुनाट तापामुळे होणारी शरीराची आग कमी करण्यासाठी केवड्याचा  उपयोग होतो. 

मंत्र – विनायकाय  नमः । केतकीपत्रं  समर्पयामि || 

21) अगस्त्य – Sesbania grandiflora 

अगस्त्य म्हणजे हादगा होय. शरद ऋतुत याची फुले व हिवाळ्यात फळे येतात. याच्या फुलांची भाजी व फळांचे लोणचे बनवले जाते.

– हादगा कफपित्तशामक आहे. 

– अगस्तिच्या पानांचा रस शिरोविरेचन (शिरः प्रदेशातील दोषांचा निचरा करणारा आहे). त्यामुळे डोकेदुखी, सर्दी, कफज ज्वर यासारख्या विकारात वापरला जातो. 

– हादगा चक्षुष्य आहे, याच्या पानांत मोठ्या प्रमाणात बीटा केरोटीन आहे त्यामुळे अगस्त्य पत्र डोळ्यांच्या तक्ररींमध्ये उपयोगी आहे. 

– फुले व पाने दीपन, अनुलोमन आणि कृमिघ्न आहेत. त्यामुळे अग्निमांद्य,जंत,पोटात दुखणे यासारख्या पचनाच्या तक्ररींत हादग्याच्या फुला-पानांची भाजी खायला देतात. 

– याची साल कासहर तसेच कफ पातळ करून काढणारी आहे. त्यामुळे चिकट कफ येणारा खोकला,खोकल्याची ढास कमी करते.

मंत्र – सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि ।।

– *अशा अत्यंत उपयोगी असलेल्या औषधी वनस्पती आपण आपल्या परिसरात नक्की लावल्या पाहिजेत आणि त्यांचा औषधी उपयोग आपले स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी करून घेतला पाहिजे*

गणपती बाप्पा मोरया
– क्रमशः
डॉ आनंद कुलकर्णी
अमृता आयुर्वेद, ठाणे
8779584840
Website – https://amrutaayurved.in/

Facebook page – https://www.facebook.com/AmrutaAyurvedPanchkarmaCenter/

Leave a Reply