काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
भाजी ( Vegetables ) – भाग 9
कडधान्य भाज्या
कडधान्याचा वापर आहारात रोज केला जातो. त्याच्यातही विविध पद्धतींनी यांचा वापर होतो. यांचा उसळ, आमटी, डाळ, मोड आलेले इ. प्रकारांनी उपयोग केला जातो. ही कडधान्ये कशी खावी, कशाबरोबर खावी, कधी खावी, व किती खावी याबद्दल आपण मागील लेखात पाहिले आहे. आता ती कडधान्ये पाहू –
मूग –
मूग हे सर्वोत्तम कडधान्य म्हणजेच कमीत कमीत अपाय करणारे कडधान्य म्हणून प्रसिद्ध आहे. हे आयुर्वेदीय वैद्यांचे प्रिय असे कडधान्य होय. मुगाचे पथ्य हे अनेक ठिकाणी उपयोगाला येते. मुगाचे कढण करून घेणे जास्त चांगले. तापामध्ये, अतिरक्तस्रावाच्या सर्व तक्रारींमध्ये मुगाचा पथ्य म्हणून वापर लाभकारी ठरतो. मेदोरोग असणाऱ्यानी मुगाचे कढण व भाजणीची भाकरी घेतल्यास निश्चित लाभ दिसतो. मुगाचे लाडू शक्तीदायक म्हणून नेहमी खाण्यास हरकत नाही. कितीही चांगले असले तरीही मुग जास्त प्रमाणात खाऊ नये. त्याने मलावरोध होऊ शकतो. तसेच मुगाची खिचडी व दुध एकत्र खाऊ नये.
हरभरा / चणे –
हरभऱ्याचा ओले / कच्चे हरभरे, सुके हरभरे / चणे, भाजके हरभरे, उकडलेले हरभरे / चणे इ प्रकारे वापर होतो. हरभऱ्याची आंब हे देखील औषधाप्रमाणे काम करते. अत्यंत वातकारक असल्याने गसेसच्या तक्रारी निर्माण होतात. दीर्घकाळ वापराने वातव्याधी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून याचा वापर स्नेहपदार्थाबरोबर करणे गरजेचे असते.
तूर / तुवर –
चव चांगली लागते म्हणून सार, आमटी, वरण, दालफ्राय इ प्रकारांनी वापर भरपूर असलेला हा कडधान्य यामधील एक प्रकार होय. परंतु गसेस – वातविकार व पित्त – असिडीटी यांचा त्रास होणाऱ्याना अत्यंत हानिकारक पदार्थ होय. कृश किंवा बारीक शरीरयष्टी असणाऱ्या लोकांनी अतिवापर करू नये.
मसूर –
काळसर रंगाचा मसूर आहारात वापरावा. याच्यामुळे शौच्यास बांधून होते. शौचास बांधून होण्यासाठी मसुराची उसळ व गव्हाचे फुलके असे खावे. अतिसार कमी होतो. आतड्यांना बळ मिळते. परंतु पचनास जड असा हा डाळीचा प्रकार आहे. जुलाबात मसुराचे कढण वापरण्याची पद्धत पूर्वी आपल्याकडे होती. अधिक घाम येणाऱ्यानी मसूर डाळीचे पीठ अंगास चोळावे. मलावरोध असणाऱ्या लोकांनी वापर टाळावा. पोटात वायू होणार्यांनी तूप तेलासह खावा.
वाटाणा –
नेहमीच्या वापरासाठी निषिद्ध असा पदार्थ होय. आमवात, संधिवात याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी खाऊ नये. वजन वाढवण्यासाठी मटार – बटाटा यांची उसळ गव्हाच्या पोळ्याबरोबर खावी. त्याबरोबरच अंगास तेल लावणे. व आहारात तुपाचा वापर ठेवावा.
भाज्यांबद्द्ल आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवूयात.
– क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
Old articles about vegetables available