काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 9
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आवळा –
आयुर्वेदाने आवळा या फळाला अनन्यसाधारण असे महत्व दिले आहे. शरीरातील सर्व अंग व अवयवांना शक्ती व तारुण्य देणारे असे हे फळ आहे. उत्साह, त्वचेची उजळ कांती व पुष्टीही या फळाच्या सेवनाने मिळते. कोणाला जर चिरतरुण म्हणजे कायम तरुण रहावेसे वाटत असेल तर नियमित ( आहारात ) आवळ्याचे सेवन करावे म्हणजे दीर्घायुष्य प्राप्त होते. स्वतःच्या आईशिवाय इतर दुसरी कोणी आपली संपूर्ण काळजी घेऊ शकत नाही. म्हणून आई ही सर्वश्रेष्ठ असते व या आईप्रमाणेच आवळा हे फळ आपल्या संपूर्ण शरीराची परिपूर्ण काळजी घेते. म्हणूनच कि काय पूर्वीच्या ऋषीमुनींनी आवळ्याला ‘धात्री’ असे म्हटले आहे. रोगामधील आवळ्याचे विविध उपयोग व घेण्याचे प्रमाण / मात्रा हे आयुर्वेदीय वैद्यांकडून जाणून घ्यावी. साधारणतः १ ते ४ आवळे दिवसाला अशा प्रमाणाने घेण्याने वरील चांगले परिणाम दिसतात. आवळा हे फळ मधुमेहामध्ये अत्यंत महत्वाचे फळ आहे. प्रमेह, मधुमेह, डोळ्यांचे विकार, सर्वांग दाह/ आग, इ विकारात आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्याने आवळ्याचा वापर अवश्य करावा.
केळी –
केळी हे फळ कधीही, कुठेही मिळणारे सहजसुलभ व स्वस्त असे फळ आहे. काही गरीब लोकांच्या आहारात केळीचा वापर भरपूर केला जातो. आहार जास्त घेण्याची किंवा सारखे खा – खा करण्याची सवय ज्यांना लागलेली असते त्यांनी केळी खावीत किंवा केळी तुपाबरोबर खावीत याने खा – खा कमी होते. अम्लपित्त, पोटात आग, अल्सर अशा तक्रारींसाठी केळी खाणे उत्तम होय. कच्ची केळी भाजी करण्यासाठी किंवा भजी करण्यासाठी सुद्धा वापरतात. वारंवार जुलाब झाल्यास कच्च्या केळ्याची भाजी खावी. केळफुलाची भाजी लहान मुले, स्त्रिया, मधुमेही रुग्णांना चांगली समजली जाते. आता केळी कधी किंवा कशी खाऊ नये हे पाहू. दुध व केळी एकत्र खाऊ नये ( जसे समाजात शिकरण खाण्याची चुकीची प्रथा रूढ झाली आहे ). सर्दी, खोकला, दमा, कफाचे रोग, ताप, अंगावर सूज असताना केळी खाऊ नये. भूक न लागताच किंवा अति प्रमाणात केळी खाणाऱ्याना विविध रोगांना सामोरे जावे लागते. रात्री शक्यतो केळी खाऊ नये. दुध, दही, ताक यांच्याबरोबर केळी खाऊ नये. फक्त तुपाबरोबर केळी खाल्ली तर चालतात.
-क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
Old articles about vegetables and fruits available