काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 8
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आता आपण क्रमाने एक एक फळांबद्दल पाहू.
द्राक्षे – ( बेदाणे / मनुके )
आयुर्वेदानुसार सर्व फळांमध्ये श्रेष्ठ असे फळ होय. गोड द्राक्षे खाणे हितकारक होय. आंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नये. सप्तधातूवर्धक व बलदायक असे हे फळ आहे. याच्या सेवनाने शरीरातील विषारांचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यातील उष्णतेमध्ये द्राक्षांचा वापर शरीराला थंडावा आणण्यासाठी करतात. पोट साफ न होणाऱ्यासाठी, अम्लपित्त या रोग्यांसाठी हितकर असे फळ होय. याचे ही अति सेवन करू नये. अति तेथे माती हे सांगितलेलेच आहे.
डाळिंब –
डाळिंब हेही एक श्रेष्ठ फळ आहे असे आयुर्वेद म्हणतो. रक्तशुद्धी, रक्तवाढ, व त्यामुळेच आरोग्यप्राप्ती ही या फळाच्या उपयोगाने होते. रोगप्रतिबंध, प्रतिकारक्षमता वाढवणे व रोगनाश करणे यासाठी हे फळ उत्तम होय. शरद ऋतूत ही फळे येतात म्हणजेच ऑक्टोबर हिटमध्ये या फळांचा वापर उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांसाठी करता येतो. पित्ताचा त्रास असणाऱ्याना हे फळ एक वरदानच आहे. कोणते फळ खावे ? कोणते फळ चांगले ? किंवा रोग्याला कोणते फळ न्यावे ? अशा विचारात असाल तर डाळिंब घेवून जा. असे हे उत्तम व गुणी फळ आहे. कोणालाही अपाय न करणारे असे हे फळ आहे. लहान मुलांना या फळाचा रस देण्याने शक्ती येते. या फळाचा वापर शक्यतो कोणासही निषिद्ध नाही. तापामध्ये सुद्धा – अधिक ताप, तहान, लघवीला गरम – उष्ण होत असल्यास डाळिंब हे फळ उत्कृष्ट औषध म्हणून काम करते. डाळिंब याचा रस ताजाच वापरावा.
-क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
Old articles about vegetables and fruits available