काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 4
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आईस्क्रीम –
हाही अतिशय रूढ असा परंतु धोकादायक प्रकार होय. एक वेळ खाण्याने काय होणार आहे ? असा विचार करू नका. कारण एक आईस्क्रीम किंवा एक फ्रुट सलाड खाण्याने दमा असलेल्या किंवा ताप असलेल्या व्यक्तीचा जीव-प्राण कसा कंठाशी येतो हे बरेच अनुभवलेले आहे. ( अर्थात कधी, काय, किती खावे याचा विचार न करता केलेले नुकसान करते – अविचार घटक ठरतो. ) आईस्क्रीम चा वापर पूर्णपणे टाळावा असे म्हणत नाही परंतु तारतम्याने वापर करावा.
हल्ली प्रत्येक कार्यक्रमांमध्ये बुफे जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची पद्धत ( सुरु नाही ) रूढ झाली आहे. एवढेच काय तर हॉटेलवालेच हा आमचा मेनू आहे असे म्हणून आईस्क्रीमशिवाय पूर्णत्वच नाही असे काहीसे झालेले आहे. हे सर्व एकदम घातक असे चाललेले आहे. यात आपण कधी, कसे गुरफटून गेलो हेच आपल्या लक्षात आले नाही. परंतु कार्यक्रमांमधील पनीर इ जड जेवणानंतर, कफाच्या प्रचंड वाढीनंतर पुन्हा वरून आईस्क्रीम खाणे म्हणजे रोगांना विकतचे ( वा फुकटचे कसेही असो ) निमंत्रण दिल्यासारखेच होते. पूर्वीचे पान, बडीशेप इ पाचक पदार्थ खाण्याचे सोडून आईस्क्रीम, मिल्कशेक, फ्रुटसलाड इ चुकीच्या वस्तू यांचा वापर हा केवळ मूर्खपणाच होय. व आपण त्याला आजकाल सभ्यतेचा भाग बनवून ठेवला आहे.
शिकरण / शिक्रण –
दुध व केळी एकत्र करून खाणे म्हणजे शिकरण होय. यामध्ये केळी आंबट असण्याचा संबंध येत नाही परंतु थोडा अधिक काळ तसेच ठेवून पहा बघू हे मिश्रण, कसा बदल त्याच्यात पाहायला मिळतो. (रंग बदलतो, चिकट होते इ.) पोटात गेल्यावर तेच होणार आहे. वर दुध – फळे, मिल्कशेक यामध्ये हे सांगितलेलेच आहे परंतु सध्या शिकरणाचा वापर समाजामध्ये जास्त असल्याने केवळ हा मुद्दा वेगळा नमूद केला आहे. म्हणजे त्याचे महत्व पटण्यास मदत होईल. म्हणून शिकरण सुद्धा न खाल्लेलेच बरे. ( येथे सुद्धा भूक, प्रकृती, ऋतू इ चा विचार करून खायला हवे – आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला आवश्यक. )
फलाहार –
फळे ही आहाराच्या ऐवजी ( नाश्ता म्हणत नाही ) खाणे योग्य नाही. आहार तो आहाराच. वैद्याच्या सल्ल्याशिवाय दिवसेंदिवस फक्त फालांवरच राहणे हेही योग्य नाही. कारण केवळ फलाहार करणे शरीरास फायदेशीर ठरेलच असे नाही. तथापि योग्य वैद्याच्या सल्ल्याने असे औषधी प्रयोग करणे हा भाग पूर्णतः वेगळा झाला, हे लक्ष्यात घ्यावे.
सकाळी कि संध्याकाळी ? –
येथेही पुन्हा तोच मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा कि सकाळी कफाचा काल असतो म्हणून विकृत कफ वाढवणाऱ्या गोष्टी, थंड गोष्टी न घेतलेल्यांच बऱ्या. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तापूर्वी वाताचा काल असतो त्यावेळी फळे खाणे चांगले म्हणता येईल. कारण संध्याकाळी नाश्ता म्हणून फळे खाण्याने वात दोषाला नियंत्रित ठेवणे शक्य होऊ शकते. पुन्हा रात्री फळे घेण्यासही तोच मुद्दा – कफाच्या वाढीचा . रात्री थंडपणामुळे व पचन शक्ती मंद असल्यामुळे फळे खाण्यास निषिद्धच होय. ( प्रत्येक गोष्टीस अपवाद व उपाय असतातच – अपवादाने खाल्यास उपाय करता येऊ शकतो ) ( आयुर्वेदीय वैद्यांचा सल्ला आवश्यक – लेखाकासही विचारू शकता.)
फळांचे वरीलप्रमाणे अनेक दुष्परिणाम आपल्याला पहायला मिळतात, त्यावरील उपायांसाठी आयुर्वेदीय वैद्य / डॉक्टर सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
फळांविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवू. -क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594