काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 3
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
जेवणानंतर कि जेवणापूर्वी ? –
फळे जेवणानंतर कि जेवणापूर्वी घ्यावीत असा प्रश्न सर्वसाधारणपणे सर्वांच्याच मनात असतो. आणि हल्ली फळे ही जेवणानंतर खाण्याचा प्रघात रूढ झाला आहे. आता फळे खाणे काही वाईट नाही, त्याचा फायदाच होतो पण कधी, काय व किती खावे हे माहित असेल तर त्याचा जास्ती फायदा होण्यास नक्की मदत होते. म्हणून फळे ही आरोग्यास चांगलीच आहेत व ती खाल्लीच पाहिजेत. मग आताच्या जीवनशैलीनुसार निवांत वेळ जेवणानंतरच मिळतो, म्हणून फळे आजकाल जेवणानंतरच खाल्ली जातात. परंतु जेवणानंतर कफदोषाच्या वाढीचा काळ असतो. फळे कफ वाढवतात. एकूणच परिणाम कफाचे रोग होण्याकडे होतो. तसेच आयुर्वेदातील नियमानुसार गोड, आंबट हे रस ( टेस्ट्स ) जेवणाच्या सुरुवातीला व शेवटी कडू – तुरट रस घ्यायला सांगितले आहेत. फळे ही मुख्यतः गोड, आंबट याच दोन रसांची असतात. आता स्वीट डिश च्या नावाखाली जेवणामध्ये आपण नेमके उलटे करतो. गोड हे शेवटी खातो. व सर्दी, खोकला यापासून ते हृदयातील धमन्यात कोलेस्टेरोल नामक कफाची संचिती होई पर्यंत सर्व रोगांना आमंत्रण देतो.
म्हणून जेवणाच्या सुरुवातीसच फळे खावीत. किंवा जेवणाच्या मधेमधे ( जेवणातील पदार्थ ज्याबरोबर फळे खावीत कि नाहीत हे ठरवून – आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला घेऊन ) फळे खाण्यास हरकत नाही.
रिकाम्यापोटी (नुसती) फळे खावीत कि नाही ? –
फळांचा प्रकार, आपली प्रकृती व चालू ऋतुमान ( सीझन ) यानुसार ठरवून फळे खावीत. उदा. पित्त प्रकृतीच्या माणसाने अननस रिकाम्यापोटी खाल्याने काही जणांना पोटात जळजळ, वेदना जाणवते. म्हणून अगदी रिकाम्यापोटी फळे खाऊ नये.
काहीजण जेवणापूर्वी फळांचा रस घेतात कारण काय तर याने चांगली भूक लागते. पण सर्वांनाच हे मानवत नाही. उलट बऱ्याच जणांना याचा त्रासच होतो. भूक लागण्यासाठीच असेल तर फळांच्या रसाच्या ऐवजी आल्याचा रस किंवा आलेपाक घ्यावा, त्याने भूक नक्की लागते , वाढते. ( सर्वच गोष्टींचे समाधान लेखात करू शकत नसेन कदाचित पण शंका जरूर विचारू शकता. )
फळांचे वरीलप्रमाणे अनेक दुष्परिणाम आपल्याला पहायला मिळतात, त्यावरील उपायांसाठी आयुर्वेदीय वैद्य / डॉक्टर सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
फळांविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवू. -क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594