काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 2
मिल्कशेक – हा एक दुसरा भयानक प्रकार आहे. व भरपूर प्रमाणात वापरात असलेला असा आहे. फळातील आंबटपणा व रसांचा दुधावर विपरीत परिणाम होऊन एक प्रकाराचे घातक विष बनते. व ते सतत पोटात जाण्याने रोगांची उत्पत्ती होते. आपण व्यवहारात नेहमी उदाहरण बघतो कि दुध तापवताना जर त्यास कसला हात लागला , आंबट पदार्थ दुधात टाकला, मीठ टाकले इ. दुधाच्या गुणधर्मांच्या विपरीत मिश्रण झाले तर दूध फाटते, नासते, खराब होते. म्हणून आयुर्वेदाने फार सांभाळून दुधाबरोबर काय खावे व काय खाऊ नये याबद्दलचे नियम दिले आहेत. फळे व दुध एकत्र खाण्याने अम्लपित्त, त्वचाविकारांपासून ते गंभीर आजार निर्माण होण्यापर्यंत त्रास शरीरास सहन करावे लागतात. मागे म्हटल्याप्रमाणे हे कोणाला सांगून पटतच नाही कारण हे प्रकार एवढे रूढ झाले आहेत कि त्यांच दुष्परिणाम होतो हे लक्षातच घेत नाहीत. कारण कोणतीही गोष्ट घडून येण्यास किंवा तयार होण्यास ठराविक कालावधी जावा लागतो तसेच रोग होण्यासाठी सुद्धा काही काळ जावा लागतो. म्हणून वरील पदार्थ एकदा दोनदा खाण्याने काही होत नाही पण वारंवार खात राहिल्याने नक्कीच रोग उत्पत्ती झालेली दिसते. मिल्कशेक इ प्रकार वर्षानुवर्षे सेवन करणाऱ्याची संख्या डॉक्टरांकडे जास्त असते. ( हे डॉक्टरांच्या लक्षात येत असते.) सामान्य माणसांना या गोष्टी डॉक्टरांकडूनच ऐकाव्या लागतात. पण ऐकतो कोण ? माझेच खरे. मग डॉक्टरांनी तरी काय करावे ? म्हणून आयुर्वेद सांगतो मूळावर घाव घाला म्हणजे समूळ रोग नाहीसा होईल.
डबाबंद कॅनमधील फळांचे रस किंवा तुकडे – कोणतेही साठवलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, प्रीझर्र्वेटीव असलेले पदार्थ आरोग्यास हानिकारकच असतात. म्हणून शक्यतो ताजी फळे घेऊन खावीत. क्काही ठिकाणी दुसरा पर्याय काय ? प्रवासात काय करणार ? अशा पळवाटा काढून डबाबंद फळे खाल्ली जातात. पण याव्यतिरिक्त इतर पदार्थ ( उदा. राजगिरा लाडू इ जे टिकतात असे ) उपलब्ध नसतात का ? पर्र्याय शोधला तर नक्की सापडतो, फक्त बुद्धी वापरून जगावे लागते व इच्छा असावी लागते. अविचाराने केलेल्या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम कधी न कधी तरी भोगावेच लागतात.
प्लास्टिक, अॅल्युमिनियम इ भांड्यात ठेवलेली फळे, जॅम इ. – आंबट पदार्थांच्या संपर्कात आल्याने या विषारी धातूंचा अंश विरघळून त्या पदार्थांमध्ये येत असतो. व खाण्याबरोबर तो खाणाऱ्याच्या पोटात जात असतो. कनिंग फक्टरीमध्ये डब्यात भरण्यापूर्वी या पदार्थांवर जे संस्कार केले जातात, ज्या प्रक्रिया केल्या जातात, त्यासाठी लागणारी भांडी इ. स्वस्त व वजनाला हलकी म्हणून अॅल्युमिनियम इ धातुंचीच वापरली जातात, त्यांचा दुष्परिणाम होतो व हे विष वर्षानुवर्षाच्या वापरानंतर शरीरात साठून राहून विविध रोगांची निर्मिती करते जे आपल्याला कळतही नाही कि हे रोग या विषांच्यामूळे झाले असतील म्हणून. ( यासाठीच आयुर्वेदाने पंचकर्मामध्ये शरीर शुद्धीचे उपाय सांगितले आहेत ते योग्य वैद्याच्या सल्ल्याने करुन घेणे योग्य होय. त्यामुळे कळत नकळत जे दोष शरीरात जात असतात, ते बाहेर जाऊन आपल्याला स्वास्थ्य प्राप्त होण्यास नक्कीच मदत होईल. Prevention is better than cure.)
फळांचे वरीलप्रमाणे अनेक दुष्परिणाम आपल्याला पहायला मिळतात, त्यावरील उपायांसाठी आयुर्वेदीय वैद्य / डॉक्टर सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
फळांविषयी आणखी माहिती आपण पुढील लेखात जाणून घेवू. -क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594