काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 12
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आंबा –
आंबा कोणाला माहित नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. फळांचा राजा म्हणून या
फळाला बहुमान दिला जातो. वसंत ऋतूत बहरणारे हे फळाचे झाड आहे. आंब्याचे अनेक प्रकार
बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी, मलगोवा, मद्रास हापूस,
नीलम, रासपुरी, बंगाली, लोणच्याचा आंबा, रायवळ, गावराण आंबा इत्यादी अनेक नावे ऐकायला
मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना प्रिय असणारे असे हे फळ आहे.
आंब्याला मोहोर आलेला पाहून गानसम्राज्ञी कोकिळा सुद्धा खुश होऊन गाणे गायला लागते.
आंबा हा वाळवंट व कोरडी रेतीयुक्त जमीन सोडून सगळीकडे होतो. लाल मातीत विशेषतः
कोकणात याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जंगली आंब्याचे झाड उंच व मोठ्या आकाराचे
असते. तर कलमी आंबे छोटे, डेरेदार, गोल, बुटके, असतात. या झाडांना कोवळी पाने वसंतात
येण्यास सुरुवात होते. त्यानंतर फुले येतात. या फुलांना आंब्याचा मोहोर असे म्हणतात. याचा
सुगंध खूप छान येतो. कधीकधी ढगाळ वातावरण व आर्द्रता वाढणे यामुळे मोहोर गळून आंब्याचे
नुकसान होते. मोहोर आल्यानंतर फळे यायला सुरुवात होते. कच्या फळांना कैरी असे म्हणतात.
कैरी हिरवी, तेलकट, काळसर ठिपके असलेली असते. पिकलेला आंबा पिवळा लालसर असतो. व
याचा अत्यंत मोहक सुगंध येतो. फळाच्या आतमध्ये बी / कोय असते.
आंब्याचा मोहोर, कैरी, आंबे, आंतरसाल, पाने, डिंक / गोंद या सर्वांचा औषधात उपयोग
होतो.
आंब्याचा मोहोर –
अतिसार / जुलाब होत असल्यास दह्याबरोबर याचा रस काढून घ्यावा. कीटक दंश
झाल्याने होणाऱ्या वेदनेवर मोहोर चोळून लावला असता वेदना कमी होतात. लघवीतून पांढरे जात
असल्यास याचे चूर्ण मधासोबत घ्यावे. मधुमेहाच्या रुग्णांना आंब्याचा मोहोर उपयुक्त होतो,
त्यांची मुत्र प्रवृत्ती कमी होते. तोंडाचा चिकटपणा, लाळ / चुळा सुटणे यासाठी मोहोर चावून रस
थुंकून द्यावा. नाकातून रक्त येणे, अंगावर चट्टे उठणे, खाज, आग होणे इ साठी मोहोर याचा
उपयोग होतो. जिरे – धने यांच्या पावडरबरोबर मोहोर खाल्यास अम्लपित्त acidity यास उपयोग
होतो.
आंब्याची कैरी –
आंब्याची कैरी ही दोन अवस्थांमध्ये मिळते. एक तुरट रसाची व बी अजून जास्त वाढलेले
नाही अशी आणि दुसरी आंबट रसाची, घट्ट व मोठी. पहिली तुरट रसाची कैरी खाल्यास वात
वाढतो, मलावष्टंभ, मूत्र अल्पता अशा तक्रारी होऊ शकतात. दुसरी आंबट रसाची खाल्यास पित्त
वाढते, दात व हिरड्यांना त्रास होतो. तुरट रसाची कैरी जुलाबाचा त्रास होत असताना खावी व
आंबट रसाची जिभेला चव आणण्यासाठी खावी. तसेच लोणचे, चटणी, शिरका, आमटी, भाजी इ
करण्यासाठी आंबट कैरी वापरावी. कैरीचे पन्हे हाही एक स्वादिष्ट, हृदयाला हितकर असा प्रकार
आहे. पन्हे पिल्यामुळे उन्हाळ्यातील तहान, आगआग लवकर कमी होते. आंबट कैऱ्यांची साल
वाळवून ठेवून द्यावी. वर्षभर आमटीत, भाजीत टाकून खाता येते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे
त्यांनी हा प्रकार टाळावा. कच्ची कैरी व सैंधव मीठ असेही लावून आपण खाऊ शकतो. कच्ची
कैरी जास्त प्रमाणात खाल्याने पोटात दुखणे, अजीर्ण, घशाशी येणे, पातळ-चिकट शौच होणे इ
तक्रारी दिसून येतात. कैरी खाल्यावर थंड खाणे / पिणे शक्यतो टाळावे.
-क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
Old articles about vegetables and fruits available