काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फलवर्ग

फळे ( Fruits ) भाग 11

फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.

कलिंगड –

खासकरून उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या या फळाचा उपयोग शरीरात शीतता आणण्यासाठी, थंडावा मिळण्यासाठी म्हणून खूप छान करून घेता येतो. याचे काप करून फोडी खाव्यात किंवा रस काढून तो घ्यावा. पण दुधासोबत घेऊ नये. मुत्रासंबंधी तक्रारींसाठी हे एक उपयुक्त फळ होय. जिरे पावडर, धने पावडर व खडीसाखर प्रत्येकी एक चमचा व अर्धा ग्लास रस असे घेतल्याने लघवीची जळजळ, दाह इ कमी होण्यास मदत होते. डोळ्यासमोर अंधारी येणे, अनिद्रा, अल्पनिद्रा यामध्येही याच्या वापराने लाभ दिसून येतो. याच्या सालीच्या पांढऱ्या भागाचा – अंगाची लाही होत असताना लेपन करण्याने उपयोग होतो. कलिंगड या फळाच्या वापराने शरीरात मांसपुष्टी होते, त्वचेची रुक्षता कमी होते. या फळाचे सेवन रात्रीच्या वेळी शक्यतो करू नये, दिवसा खाण्यास हरकत नाही. सूज असताना याचा वापर कमी ठेवावा. भाताबरोबर कलिंगड खाऊ नये. अधिक माहिती व शंकांसाठी आयुर्वेदीय वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.

अननस – ( पायनॅपल )

कच्चे फळ व पिकलेले फळ असे दोन्ही बाजारात मिळतात, दोघांचेही परिणाम वेगवेगळे दिसतात. याचे फळ कच्चे असताना लाल रंगाचे, पंचकोनी, षटकोनी आकाराचे दिसते, पिकल्यावर तेच पिवळे, तांबूस रंगाचे दिसते आणि मोहक असा सुगंध येतो. कच्चे फळ हे पचायला अत्यंत जड असते. त्यामुळे पोटात दुखणे, जीभ जड होणे इ तक्रारी निर्माण होतात. गर्भिणी स्त्रीने कच्चे फळ खाऊ नये. पिकलेले फळ हे मोहक सुगंधी असून आपल्याला आकर्षित करते. त्याची चव आंबट गोड अशी असते. हे पचनास उपयुक्त फळ असून याच्या वापराने पाचक स्त्राव भरपूर प्रमाणात स्त्रवतात. मांसाहारासारखे जड अन्न पचवण्यासाठी अननसाचा वापर करता येतो. मलप्रवृत्ती साफ होत नसल्यास जेवणामध्ये याच्या फोडी खाव्यात, म्हणजे पाचक स्त्राव चांगले स्त्रवून, पचन क्रिया नीट झाल्याने पोट साफ होते. मुत्राला दुर्गंधी येणे, लघवी साफ न होणे यासाठी याचा रस घ्यावा. कावीळ या रोगात मळाचा रंग पांढरा झाल्यास, मळ चिकट झाल्यास अननस वापरावा. मात्र पोटात जळजळ व्हायला लागल्यास वापर थांबवावा. ( वैद्यांचा सल्ला घ्यावा. ) आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी, वारंवार सर्दी होत असलेल्यांनी अननस वापरू नये. पित्त प्रकृती असणाऱ्यानी, नेहमी मद्य सेवन करणाऱ्यानी, प्रचंड भूक लागलेल्यांनी, रिकाम्या पोटी अननसाचा वापर करू नये. डबाबंद, पॅक असे अननस कधीही घेऊ नये. अल्युमिनियमच्या भांड्याचा व अननस यांच्या संयोगाचा विपरीत परिणाम शरीराला घटक ठरू शकतो.  पायनॅपलचे आईस्क्रीम, मिल्कशेक यांचा वापर कधीही करू नये. लहान मुलांना अननस देऊ नये यामुळे त्यांच्या आतड्यांना त्रास होऊ शकतो. असे हे गुणी फळ असले तरी जपून वापर केल्यास योग्य परिणाम दिसतात.

-क्रमशः

                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),

CYEd, DYA, MA (Sanskrit)

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594

For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
 
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –