पावसाळा ऋतू आणि आयुर्वेदानुसार काळजी
पावसाळा या ऋतुंमध्ये कसे जगावे याचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात आले आहे.
या निसर्गात होणाऱ्या बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो हे विविध प्रकारच्या संशोधनातून समोर आलेले आहे. या ऋतुंच्या चक्रानुसार आपल्या आहार विहारांचे नियोजन केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होण्यास नक्कीच मदत मिळते.
ऋतुचक्रामध्ये पहिल्या ऋतूचा एक आठवडा व दुसऱ्या ऋतूचा एक आठवडा असे दोन आठवडे हे ऋतू संधी काळ म्हणून समजले जातात. या ऋतू संधीकालात आधीच्या ऋतूमधील आहार व विहार (जगण्याच्या सवयी) यांचा त्याग करून पुढील येणाऱ्या ऋतूमधील आहार व विहार इ च्या नियमांचा हळूहळू स्वीकार करावा लागतो, अन्यथा मागील ऋतूमधील आहार व विहार इ चे नियम तसेच चालू ठेवले तर आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसतात.
पावसाळ्यात निसर्गतःच असलेल्या ओलाव्यामुळे / आर्दतेमुळे, पाऊसाने दुषित पाणी व थंडावा इ कारणामुळे आपली पचन शक्ती मंद झालेली असते. म्हणून पावसाळ्यात रोगराई, साथीचे आजार भरपूर पसरतात. थंडाव्यामुळे शरीरातील वात दोषाचे प्रमाण वाढलेले असते. म्हणून दमा, सांधेदुखी इ वातविकार यांचे प्रमाणही वाढलेले दिसते.
म्हणून पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही सल्ले खालील प्रमाणे –
– मुसळधार पावसात बाहेर फिरणे शक्यतो टाळावे.
– थंड हवा लागू नये म्हणून उबदार कपड्यांचा वापर करावा.
– नेहमी कोरड्या जागेत रहाण्याचा प्रयत्न करावा.
– पहिल्या पावसात भिजल्याने कधीकधी अंगावर शितपित्ताचे पुरळ उठू शकतात. म्हणून दरवेळी सुती, स्वच्छ, व कोरडे कपडे घालावे.
– पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण अधिक असते. म्हणून पावसाळ्यात पाणी मंद आचेवर १५ ते २० मिनिटे उकळवून घ्यावे व चार पदरी फडक्याने गळून घ्यावे. फिल्टरमधून गाळून आलेले पाणी फिल्टर झालेले असेल पण निर्जंतुक किंवा पिण्यास योग्य कितपत होईल शंकाच वाटते. त्यापेक्षा जुना, निर्धोक व कमी खर्चाचा असा हा पर्याय वापरणे जास्त चांगले.
– पावसाळ्यामध्ये हवा, वातावरण शुद्ध राहावे, हवेमधील हानिकारक जीवाणू नष्ट व्हावेत म्हणून कडूनिंब, कापूर, गुग्गुळ, उद, वावडिंग इ वनौषधींची धुरी द्यावी. नियमित धुरी करण्यामुळे वातावरण शुद्धी होऊन हवेतून होणाऱ्या रोग प्रसाराला आळा घालता येऊ शकतो.
– पावसाळ्यामध्ये पालेभाज्या कमी खाव्या. कारण खराब पाण्यामुळे यांच्याद्वारेच रोग प्रसार होऊ शकतो.
– पचायला जड अन्न, मांसाहार, पनीर इ पदार्थ टाळलेले जास्त चांगले.
– बेकरीचे पदार्थ, साबुदाणा, आंबवलेले, इडली-डोसे इ पदार्थ टाळून हलका आहार घ्यावा.
– पायी चालणे, दिवसा झोपणे इ टाळावे.
– थंड वाऱ्याचा जोराचा झोत अंगावर घेणे टाळावे. आजकाल बस, ट्रेन इ वाहनामधून प्रवास करताना पावसाळ्यात लोक मुद्दाम थंड हवेचा झोत अंगावर घेतात, परंतु दोषांची वृद्धी झालेली असल्यास अश्या व्यक्तीस अंगावर लाल गांधी येणे इ पासून ते गंभीर आजार होईपर्यंत त्रास सहन करावा लागतो.
– व्यायाम कमी प्रमाणात करावा ( खरेतर पावसाळ्यात व्यायाम बंद ठेवणे जास्त योग्य. अतिव्यायामाने वातवृद्धी होते. )
– नाक वाहणे, सर्दी खोकला झाल्यास गरम पाणी पिणे, वाफ घेणे, गरम दुध हळद घेणे इ करावे. तक्रारी जास्त असल्यास आयुर्वेदीय वैद्याकडून सल्ला घ्यावा.
– पावसाळ्यात पचनशक्ती मंद होत असते. म्हणून गरम-गरम व हलका आहार घ्यावा.
– आले, सुंठ, सैंधव, मध यांचा वापर पावसाळ्यात आहारात करावा.
– वाढलेल्या थंडाव्यामुळे सांधेदुखीचे प्रमाणही वाढते. त्यामुळे सांध्यांना तिळाचे तेल लावून गरम शेक देणे हितकर ठरते. ( आयुर्वेदिक पंचकर्मे सुद्धा या ऋतूत केल्यास वाताच्या रुग्णांस नक्की फायदा होतो.)
– दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी नेहमी अंग गरम राहील यासाठी गरम व उबदार कपडे घालावेत. नियमित प्राणायाम करावा. छातीला औषधीसिद्ध तेल जिरवून गरम शेक द्यावा.
– पोटाचा त्रास, जुलाब इ असणाऱ्यांनी आले, सुंठ, लिंबू, सैंधव यांचे मिश्रण जेवणापूर्वी चाटण घ्यावे. पचायला हलका व शक्यतोवर गरम आहार घ्यावा.
– त्वचेचे विकार जसे अंगावर गांधी उठणे, पुरळ येणे इ पावसाळ्यात दिसतात. यावर साबणा ऐवजी कडूनिंब, खदिर इ च्या सिद्ध काढ्याने त्वचा साफ करावी किवा स्नान करावे.
– पावसाळ्यामध्ये आजार होऊ नयेत म्हणून आधी काळजी ( Prevention म्हणून ) आयुर्वेदीय ऋतुचर्येप्रमाणे आहार विहार यांचे पालन करावे. योग्य ती पंचकर्मे करून घेऊन शरीरशुद्धी ठेवावी. म्हणजे पावसाळ्यातील आरोग्य टिकवणे सोपे होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क – अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, ठाणे ९८६९१०५५९४
वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
& Old articles available