पालेभाज्या व आयुर्वेद (Leafy vegetables and Ayurveda)
आयुर्वेदात फार प्राचीन कालापासून पथ्यकर व कुपथ्यकारक असे आहारपदार्थाचे केलेले वर्गीकरण ग्रंथात आढळते. धान्ये, कडधान्ये, फळे, दूध, मीठ, मांस, फळभाज्या, तोंडलावणी या अनेक प्रकारच्या अन्नपदार्थाचे प्रत्येकाचे काही खास वैशिष्टय़ आहे. आहारात पालेभाज्यांचे स्थान मर्यादित आहे. म्हणूनच पालेभाज्या खाताना विशेष काळजीही घ्यायला हवी. सर्व खाद्यपदार्थात पाने, फुले, फळे, कांड, कंद हे क्रमाक्रमाने अधिक बलवान आहेत. अधिक सुशिक्षित मंडळी आधुनिक आहारशास्त्र वाचून आपल्या मुलाबाळांकरिता पालेभाजी खाण्याचा आग्रह करीत असतात. तो आग्रह अति नसावा.
नुसती भाजी / पोळी किंवा भाकरी खाऊन पोट भरेल; पण नुसत्या पालेभाज्या खाऊन किंवा त्यांचा रस पिऊन पोट भरणार नाही. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत. पालेभाज्यांचे आहारात मर्यादित काम आहे. त्याकरिता त्या मर्यादा आपण समजावून घेणे आवश्यक आहे.
1) पालेभाज्या या अल्पायू आहेत. त्यांची वाढ दहा-पंधरा दिवसांत किंवा जास्तीत जास्त तीन आठवडय़ांत होते. या काळात त्यांनी जमीन, पाणी किंवा वातावरणातून घेतलेला जीवनरस हा असाच अल्पायू, कमी आयुष्य देणारा असतो. धान्ये, फळे, कंद यांच्यामध्ये त्या त्या द्रव्यांचा परिपोष झालेला असतो. तसे पालेभाजीत नाही. पालेभाजी शरीराला स्थैर्य देऊ शकत नाही. तरीपण जेव्हा विविध डॉक्टर मंडळी कॅल्शिअमच्या कमतरतेकरिता, कॅल्शियम गोळय़ा घ्यायला सांगतात, तेव्हा त्यांना पर्याय म्हणून पालेभाज्यांचा वापर करून शरीरात कॅल्शिअमची अपेक्षित वाढ होऊ शकते.
2) पालेभाज्यांतील दुसरा दोष म्हणजे त्यांची उंची लहान असते. त्यामुळे त्यांचा जमिनीतील मातीशी जास्त संपर्क येतो. पालेभाजीच्या पानांमध्ये हजारो बारीक बारीक अतिसूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते. आपण मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत यांची भाजी आणतो, धुतो, चिरावयास घेतो. स्वयंपाक करणारी मंडळी कटाक्षाने प्रत्येक पान स्वच्छ धुऊन भाजी करीत असतील का? त्यामुळे खराब पाणी पिऊन ज्यांना कृमी, जंत, आमांश, पोटदुखी, जुलाब, उलटय़ा हे विकार नेहमी नेहमी होत असतात, त्यांनी पालेभाज्या काळजीपूर्वक निवडून स्वच्छ करूनच खाव्यात. पोटाची तक्रार असणाऱ्यांनी पालेभाजी टाळलेली बरी. खायचीच असेल तर त्यासोबत आले, लसूण, जिरे, मिरी, सुंठ, हिंग, मोहरी यांचा वापर असावा.
3) पालेभाज्यांतील आणखी एक दोष म्हणजे लघवी कमी होणे. लघवीची आग होणे, लघवी कोंडणे या तक्रारी असणाऱ्यांनी पालेभाज्या खाऊ नयेत. पालेभाज्यांत एक प्रकारचे क्षार असतात. चाळिशीच्या वर वय झालेल्या व्यक्तींना लघवीचा त्रास असला तर लघवीवाटे हे क्षार बाहेर टाकणे अवघड असते. वासनवेल (पाठा), कचोरा, कुरडू, विष्णुक्रांता, चाकवत, दुधी या भाज्या पथ्यकर, पचायला हलक्या व त्रिदोषहारक आहेत.
पडवळ, शिकेकाई, कडुनिंब, सागरगोटा, बावची, गुळवेल, वेताची पाने, रिंगणी, डोरली, अडुळसा, ब्राह्मी, रानतीळ, करटोली, कारले, पित्तपापडा, वांगे, पुनर्नवा, दोडका या सर्वाची पाने मलावष्टंभ, वातूळ, पित्त कमी करणारी, थंड, चवीने कडू व वजन घटविणारी आहेत. आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ तर मोहरी सर्वात कनिष्ठ पालेभाजी मानली आहे.
अळू
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी, गळू फुटतात.
अंबाडी
अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे; पण डोळय़ाचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी उष्ण आहे, तशीच ती कफही वाढवते.
करडई
करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एक वेळ लघवी साफ होते. मात्र डोळय़ाच्या व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी सफोला या ब्रॅण्डनावामुळे झाली आहे. त्यात तुलनेने उष्मांक कमी असतात.
कुरडू
कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळय़ा पानांचा रस किंवा जूनी पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.
कोथिंबीर
पथ्यकर भाज्यांत कोथिंबिर अग्रस्थानी आहे. कोथिंबिरीचा जास्त करून वापर खाद्यपदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीरीचा वापर करावा. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा.
घोळ
घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते. रक्ती, मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीच्या विकारात उपयुक्त आहे. विसर्प, नागीण विकारात पाने वाटून त्यांचा लेप लावावा.
चाकवत
पालेभाज्यांत आयुर्वेद संहिताकार ही वनस्पती श्रेष्ठ मानतात. चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारींत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम होय.
चुका
नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता अळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.
तांदुळजा
तांदुळजा ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे. ज्यांना शरीरात सी जीवनसत्त्व हवे आहे त्यांनी तांदुळजाची भाजी खावी. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदुळजा वरदान आहे. डोळय़ाच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारींत तांदुळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतडय़ांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. स्त्रियांच्या धुपणी विकारात तांदुळजाचा रस व तांदुळजाचे धुवण फार त्वरित गुण देते. चुकीच्या औषधांनी शरीराची आग होत असल्यास तांदुळजाचा रस प्यावा. अनेक प्रकारचे विषविकार, उंदीर, विंचू विषारात याचा रस प्यावा. शरीराला आवश्यक सर्व घटक तांदुळजा भाजीत आहेत.
पालक
कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह व काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालक भाजीत आहेत. हाडे ठिसूळ झाली असल्यास पालकभाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजीचा वापर करावा. कृश मुलांना अवश्य द्यावी. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारून रक्त व अस्थी या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालक भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास थांबतात. मात्र पालकभाजी स्वच्छ धुऊन घ्यावयास हवी. फुप्फुसातील दूषित वायू हटविण्यास उपयोगी आहे.
पुनर्नवा
पुनर्नवा, घेटोळी, वसू या नावाने ओळखतात. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर सिरॅसिस, पांथरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे. पोटात पाणी झाले असताना अन्न खाल्ले की पोट फुगते. अशा वेळी पुनर्नव्याच्या पानांच्या भाजीत भात शिजवून द्यावा. पाणी होणे थांबते. पोटाची सूज कमी होते. पुनर्नव्याच्या पानांचा व मुळांचा रस काढून प्यावा. लघवी साफ होऊन शरीराची सूज ओसरते. पुनर्नव्याच्या पाल्याच्या रसाने रक्त वाढते.
माठ
माठ तांबडा व पांढऱ्या रंगाचा मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला व अम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे. मूतखडय़ाची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी वापरावी.
मुळा
कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा व त्याच्या शेंगा (डिंगऱ्या) असे मुळ्याचे चार प्रकार वापरात आहेत. कच्चा मुळा जास्त औषधी आहे. मलमूत्रप्रवृत्ती साफ करतो. दीपक, पाचक, त्रिदोषहारक आहे. मूतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा. मूतखडा विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. पांथरी वाढली असता कोवळा मुळा खावा. मुळा तापामध्ये पथ्यकर आहे. त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारण नाहीसे होते. कोवळ्या मुळ्यांच्या पानांचा जास्त औषधी उपयोग होतो. पक्व मुळा हा रूक्ष, उष्ण, पचायला जड व शारीरिक कष्ट करण्याकरिता उपयुक्त आहे. मूळव्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे, याकरिता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका व कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी व शौचास व्यवस्थित होण्याकरिता उपयुक्त आहे. मूतखडा मोडण्याकरिता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे.
डिंगऱ्या
जुना मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाच्या आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण व गुरू गुणाच्या आहेत. बियांचा लेप गंडमाळा, दडस गावी, अर्बुद, शिबे या विकारात बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. मूतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारात डिंगऱ्यांची भाजी उपयुक्त आहे.
मेथी
मेथी मधुमेहींना उपयुक्त आहे. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण सुधारतो. भूक सुधारते, पाचक स्राव वाढतात. बाह्येपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर करावा. दु:ख कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरिता मेथीच्या रसाने केस धुवावे.
राजगिरा
राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे.गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारांत पालेभाजी फार उपयुक्त आहे. शरीरस्वास्थाकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हीही आहेत.
शतावरी
शतावरी पाने अगदी बारीक असतात. पाने पौष्टिक आहेत. लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारांत रस द्यावा. कंदातील स्तन्यजनन हे गुण पानात अल्प प्रमाणात आहेत. त्यातील पानांचा ताजा रस ताकद करिता उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारांत ही पालेभाजी पथ्यकर आहे.
शेपू
शेपूची पालेभाजी वात व कफविकारात फार चांगली. उग्र वासामुळे शेपूचा वापर कमी होतो. पाने स्वच्छ धुऊन घेतली की उग्र वास कमी होतो. अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारांत लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे. सोबत जिरे, आले किंवा लसूण वापरावा. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारीवर एकवेळी दिलेली भाजी काम करते. गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरिता व बाहेरून पानांचा लेप अशा दोन्हीकरिता शेपूच्या पानांचा वापर करावा.
हादगा
हादग्याला आगस्ता असे संस्कृत नाव आहे. हादग्याची फुले पांढरी किंवा जांभळ्या रंगाची असतात. चणापीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर पाने ठेचून बांधावी. जखम भरून येते.
For more details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchkarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –