दिवाळी अभ्यंग

अभ्यंग

“दिवाळी आली, दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली”

खरंच, आपल्या पूर्वजांनी सुंदर पद्धतीने आयुर्वेदातील गोष्टींचा सणावारांशी संबंध जोडून ठेवलेला आहे, याचे खूप कौतुक वाटते.

आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे, खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नियम मोडीत काढले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपण समजून घेत नाही.

अभ्यंग म्हटले कि दिवाळी आठवते. दिवाळीच्या मंगलमयी पहाटेस अभ्यंग स्नान करतात हे सगळयांना माहिती आहे. परंतु आजकाल हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण लावला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान.

वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळीत भेटलेले हेच विसाव्याचे क्षण, आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा, आपुलकी टिकवितात.

सर्व शरीराला कोमट केलेले औषधी अभ्यंग तेल किंवा कोणतेही उपलब्ध साधे तेल सर्व अंगाला लावून जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच करायला हवा. त्यातही वात प्रकृती असणाऱ्यांनी तर आवर्जुन करायला हवा. आजच्या गतिमान जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास, रात्री कामानिमित्त जागरण, कामाचा अतिरिक्त ताण, बौध्दिक शारिरिक परिश्रम इ करणाऱ्यानी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य म्हणजे प्रतिदिन/दररोज अभ्यंग करावा.
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
*www.amrutaayurved.in*