काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 20
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
कोहळा / पेठा / कुष्मांड / Ash Gourd / Winter Melon–
कोहळा हे अत्यंत बुद्धीवर्धक असे फळ आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सांबार इ मध्ये याचा सढळ हातांनी वापर होतो. उत्तम पुष्टी करणारे फळ म्हणूनही या फळाचा गौरव केला जातो.
घराला दृष्ट लागू नये म्हणून, किंवा कुठलीही आपदा / संकट घरावर येऊ नये म्हणून घराच्या दारावर बांधण्याची प्रथा आपल्याकडे रूढ असलेली आपल्याला पहायाला मिळते.
कोहळ्याची भाजी करणे हाही एक पर्याय ( ऑप्शन ) म्हणून गृहिणींनी कोहाळ्याकडे पाहणे आज गरजेचे आहे. असे हे गुणी फळ काळाच्या ओघात थोडे दुर्लक्षितच राहिले आहे.
कोहळ्याची वेल असते. थंडीच्या शेवटी – शेवटी वसंत ऋतूमध्ये याला फुले येतात. व उन्हाळ्यात फळे येतात.
याच्या फळांचा, बिया व फळाची साल यांचा उपयोग आपल्याला करता येतो.
कोहळ्याचे फळ
फळाच्या रसाचा उपयोग त्या त्या काळीच करता येतो. फळाच्या फोडी करून त्याची भाजी करता येते. किंवा फळ किसून तुपात परतून भाजी करावी.
- कोहळ्याच्या फळाचा रस २ चमचे व जिरे पावडर अर्धा चमचा असे मिश्रण घेतल्याने मूत्र भरपूर प्रमाणात होऊन मूत्रविकार दूर होण्यास मदत होते.
- याच्या रसाचा हृदय दौर्बल्य असल्यास, जिने चढताना त्रास होत असल्यास, छातीत धडधडत असल्यास अतिशय छान उपयोग होतो.
- जुनी बद्धकोष्ठतेची सवय जर असेल तर याच्या फळाच्या रसाच्या किंवा फोडींच्या भाजीचा उत्तम उपयोग होतो.
- उत्साह वाटण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, शरीर भरण्यासाठी गव्हाची पोळी व कोहळ्याची भाजी असे घेतल्यास फायदा होतो.
- नाकातून रक्त, थुंकीतून रक्त, लघवीतून रक्त, मुळव्याध अशा रोगांमध्ये कोहाळ्याचा रस फार उपयोगी पडतो.
- डोळ्याची आग होणे, लाल होणे, दुखणे, यासाठी कोहळ्याच्या रसाच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.
- त्वचा कोरडी होत असल्यास कोहळ्याच्या कल्कामध्ये चंदन इ द्रव्ये घालून लेप केल्याने कोरडेपणा कमी होऊन त्वचा मऊ होते.
- पायाच्या टाचांना रुक्षता येऊन भेगा पडत असल्यास कोहाळ्याचा कल्क टाचेला बांधून ठेवावा. म्हणजे भेगा कमी होतात.
- कोहळ्याच्या सेवनामुळे निद्रानाश, वाईट स्वप्न पडणे, अर्धवट झोप होणे इ तक्रारी कमी होतात. ( आयुर्वेदीय वैद्याच्या सल्याने याचा वापर करावा. )
- पोटात व बाहेरून लावण्याने केसांच्या तक्रारींना फायदा होताना दिसतो.
- कोहाळ्याचा पाक – कोहळा याची साल व बी काढून किसून घ्यावा, नंतर याचा रस पिळून काढून चोथा तुपावर परतावा. काढलेल्या रसात साखर घालून पाक तयार करावा. त्यात वरील चोथा शिजवावा. पाक तयार होत आल्यावर त्यात सुंठ दालचिनी, वेलची इ पदार्थ घालावे. थंड झाल्यावर मध घालून काचेच्या बाटलीत भरून ठेवावा.
- कोहळ्याच्या पाकाचा उपयोग राजयक्ष्मा (टीबी ), क्षय, या रोगामध्ये होतो. थुंकीतून रक्त पडणे, शुक्रधातूचा क्षय होणे इ तक्रारींमध्ये हा पाक खूप छान परिणाम दाखवितो.
- जुनाट खोकल्यामध्ये कोहाळ्याचा पाक उपयोगी पडतो.
- हृदय आणि फुफुस यांच्या दौर्बल्यात हा पाक अवश्य वापरावा.
- किडनीच्या रोगांमध्ये सुद्धा या कोहळे पाकाचा उत्तम लाभ दिसुन येतो.
कोहळ्याचे बी
बाजूला काढलेले बी सुकवून वाळवून ठेवावे. दुधात वाटून किंवा शिजवून खीर करून घेतल्यास शरीराचे उत्तम पोषण होते. परीणामालाही हे थंड असते.
बी दुधात किंवा साईत किंवा लोण्यात वाटून याचा लेप चेहऱ्यावर केल्यास पुटकुळ्या, मुरूम, वांग, काळेपणा इ तक्रारींपासून दूर राहता येते.
कोहळ्याची साल –
साल काढून चांगली वाळवून ठेवावी. ही स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त होय.
याचा उपयोग शिकेकाई प्रमाणे केस धुण्यासाठी करता येतो. याने केस मुलायम, घनदाट व अधिक टिकाऊ मजबूत होतात.
सावधानता – कोहळा या फळासारखे गुणी फळ शोधून सापडणार नाही. हे फळ कोणालाच निषिद्ध नाही. कोणत्याही वयाला याचा फायदाच होतो. साधारणपणे या फळाचा कोणताच दुष्परिणाम दिसून येत नाही.
–क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –