काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान – 2
आयुर्वेद म्हणजे नुसते चिकित्सा शास्त्र नसून याचा मूळ अर्थ ‘ आयुष्यास जाणणे ’ ( कसे जगावे याचे ज्ञान ) असा होतो. जगण्यासाठी ज्या ज्या म्हणून गोष्टी आवश्यक असतात ( ज्या ज्या म्हणून – अर्थात सर्वच गोष्टी – अत्यंत विश्वासपूर्वक सांगू शकतो ) त्या त्या गोष्टींचे वर्णन आयुर्वेदात केले आहे. ( शोधाल तर सापडेल ). आहार – विहार, याचबरोबर कसे रहावे, सदवृत्त पालन ( समाजात कसे वागावे ), सृष्टीतील अ ते ज्ञ , A to Z वस्तूंचे गुण कसे जाणावे या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन आयुर्वेदाने करून ठेवले आहे. आता विषय घ्यायचाच आहे म्हणून सुरुवात ही आहारापासून केली पाहिजे कारण त्यावरच शरीराची जीवनयात्रा अवलंबून असते.
यानुसार काय, किती व का खावे ? हा प्रश्न उपस्थित होतो. सध्याच्या आधुनिक युगामध्ये जाहिराती, प्रसिद्धी माध्यमे यांच्यामधून अनेक गोष्टींचा प्रसार सतत चालू असतो. त्यातील काही गोष्टी चांगल्या तर काही गोष्टी अत्यंत वाईट, गंभीर परिणाम करण्याऱ्या ही असतात. आणि जास्त करून नुकसान करणाऱ्या असतात असा प्रत्येकाचा अनुभव असतो. म्हणूनच घरच्या आणि भारतीय म्हणवल्या जाण्याऱ्या पदार्थांचे महत्व हे मान्य करावेच लागते. वेळ नाही या नावाखाली आळस व कंटाळा या गोष्टींवर पांघरूण घातले जाते. खरे पाहता आवड असेल तरच सवड निर्माण होते. व आवड ही त्या गोष्टीचे महत्व व गांभीर्य पटल्याशिवाय निर्माण होत नाही हेही तितकेच खरे. विचार केला तर वेळ भरपूर असतो परंतु त्या वेळेचे व्यवस्थित, योग्य नियोजन जमत नाही म्हणून सगळा घोळ होतो.
न च आहारसमंकिन्चित् भैषज्यमुपलभ्यते |
आहाराच्या समान कोणतेही औषध नाही, केवळ योग्य आहारानेच अनेक रोग बरे होतात. उत्तम व उच्च प्रतीचे औषधही आहारावाचून अनेक वेळा रोग बरे करू शकत नाही म्हणून आयुर्वेदामध्ये आहार हा सर्वश्रेष्ठ औषधाप्रमाणे काम करतो असे वर्णन पहावयास मिळते.
आयुर्वेद हे शास्त्र पथ्याविषयी फार प्रसिद्ध आहे.
पथ्येसतिगदार्तस्य किमौषध निषेवणैः |
पथ्येऽसतिगदार्तस्य किमौषध निषेवणैः ||
पथ्यपालन करणाऱ्यास औषधांची आवश्यकता काय? व पथ्यपालन न करणाऱ्यास औषधांची आवश्यकता ( उपयोगिता ) काय? ( किंवा औषधांचा उपयोग नाही )
म्हणून पथ्यास अनन्यसाधारण महत्व आहे. कोणताही साईड इफेक्ट नाही, व थोडा विचार केला तर पथ्य पालन करण्यास फार कष्ट लागत नाहीत. आलीच तर आळस नावाची गोष्ट आडवी येते.
आहारातील अनेक गोष्टी आयुर्वेदाने अत्यंत सूक्ष्मतेने अभ्यासलेल्या आहेत आणि त्यांचे माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम लिहून ठेवले आहेत. या परिणामांच्या यादीमध्ये शरीरावर होणारे चांगले परिणामच नव्हे तर अनिष्ट , वाईट परिणाम ( साईड इफेक्ट ) कोणते होतात यांचीही नोंद केलेली आढळून येते. पथ्य ही एक आयुर्वेदाचे वेगळेपण , वैशिष्ट्य सांगणारी अशी गोष्ट आहे. म्हणूनच केवळ चांगले समजून ( जाहिरातींना भुलून ) ज्या भरपूर प्रमाणात एखादी गोष्ट वापरली जाते व काही काळाने ( १ / २ / ५ / १० / २० वर्षांनी ) त्याचे दुष्परिणाम दिसल्यावर ती वापरातून काढून टाकली जाते अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात. ( उदा. मॅगी इ. ) औषधांचे उदाहरण – इंग्लिश ३४४ औषधांवर सध्या बंदी आणली आहे. मग इतकी वर्षे ती चांगली आहेत म्हणून वापरली व आता ती वापरणे बंद करायची कारण त्यांचा दुष्परिणाम खूप आहे म्हणून ( आश्चर्यच ), तर मग मागील २० – ३० वर्षात ज्यांना ती वापरली त्यांचे काय ? त्यांनी तो दुष्परिणाम तर भोगला. म्हणूनच आयुर्वेदामधील तत्वे औषधे हजारो वर्षापासून वापरात आहेत त्यांचा कुठलाही दुष्परिणाम नाही ( योग्य, ज्ञानी डॉक्टर व्यक्तीकडून वापरल्यास ) असे असतांना ती न वापरणे, त्यांच्या उपयोबद्दल संभ्रम, शंका निर्माण करून ठेवणे म्हणजे केवळ मूर्खपणाच होय. म्हणजे जवळ असलेले, सिद्ध असलेले, वर्षानुवर्षे वापरात असलेले शास्त्र फेकून देऊन पुन्हा नवीन संशोधनात वेळ आणि पैसा वाया घालवण्यासारखे आहे. म्हणजे जवळ असलेला पाण्याचा साठा सोडून नवीन विहीर खणण्यास घेण्यासारखे आहे. वरील विचार करण्यासही बुद्धी, योग्य विचार असावा लागतो. आणि अशा फसवणुकीच्या, जाहिरातींच्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झालेले आपण पाहतो. म्हणून आपण आयुर्वेद काय म्हणतो हे या लेखांमध्ये पाहणार आहोत.
– क्रमशः
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –