उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 3
प्रतिबंधात्मक उपाय –
ही वरील सर्व लक्षणे / रोग उष्णतेमुळे होतात. सर्वसामान्यपणे दैनंदिन जीवनातही यासारख्या साध्या किंवा कधीकधी भयंकरही वाटणाऱ्या पण नेहमीच्या अशा तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण कालांतराने गंभीर स्वरूप धारण करू पहाणाऱ्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना ही फक्त आणि फक्त आयुर्वेदातच सांगितली आहेत असे माझे ठाम मत आहे. प्रतिबंध म्हणजे एखादी गोष्ट होऊ नये म्हणून घेतलेली काळजी होय. मग याचा विचार परिस्थिती उद्भवण्याच्या आधी किंवा ती पुन्हा होऊ नये म्हणून असा करावा लागतो. म्हणून या गोष्टी नित्य, दैनंदिन जीवनात किंवा अधूनमधून तरी कराव्या लागतात. जशी गाडीची सर्विसिंग, साफसफाई तसेच बिल्डींगची रिपेरिंग मेंटेनन्स इ.
आता यावरील उपाय क्रमाक्रमाने बघू. उपायांमध्ये सर्वप्रथम नंबर लागतो तो पंचकर्माचा.
आयुर्वेदीय पंचकर्म –
पंचकर्म म्हणजे देहाची शुद्धी होय. जसे मळलेला कपडा घासून मळ काढावयास गेलो तर तो निघत नाही. गाडीच्या कार्बोरेटरमधील कचरा घासून निघत नाही. कपडा किंवा गाडीचे भाग मळयुक्त होतात. यावर उपाय म्हणून आपण कपडा पाण्यात भिजवतो, गाडीच्या कार्बोरेटरमध्ये ऑईल इ टाकतो. व ते दोष मऊ झाले कि धुऊन काढतो, ते निघायलाही सोपे जातात शिवाय डॅमेजही होत नाही. त्याप्रमाणेच शरीरातील दोष मुलायम करून – सुट्टे करून शरीराबाहेर काढून टाकले जातात. त्यासच पंचकर्म / देहशुद्धी इ असे म्हटले जाते.
रोगी आणि स्वस्थ ( निरोगी ) या दोघांसही पंचकर्माने फायदा होतो. निरोगी व्यक्तीने मला काही त्रास नाही असे असतानाही जर ऋतूचर्येप्रमाणे पंचकर्मे करून घेतली, तर वर्षानुवर्षे साचत जाणाऱ्या रोगकारक दोषांपासून मुक्तता होते. उष्णतेच्या बाबतीतही हेच आहे. वर्षानुवर्षाच्या साचलेल्या उष्णतेला काढून टाकायचे असेल तर पंचकर्मा सारखा जालीम उपाय दुसरा कुठला नाही.
आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये गोड, कडू, तुरट चवीची औषधे, शीत / थंड, स्नेह, विरेचन, प्रदेह ( लेप ), परिषेक, अभ्यंग, रक्तमोक्षण इ उपाय हे उष्णतेची चिकित्सा करताना विचारात घेता येतात.
विरेचन ही उष्णता व पित्त या विकारांवर उत्तम व प्रधान चिकित्सा आहे असे सर्वच आयुर्वेदीय वैद्य मानतात. विरेचानाचे औषध ( रोगापरत्वे वेगळे असलेले ) पोटात जाऊन पित्ताला बाहेर काढते. उष्णता बाहेर काढतात. ( कारण उष्णता ही पित्ताच्या आश्रयाने शरीरात राहत असते ) याप्रकारे दोष बाहेर पडल्यावर शरीरांतर्गत असणारे सर्व प्रकारचे उष्णतेचे विकार नष्ट होतात. जसे आगीच्या घरातून ( चुलीमधून ) आगच बाहेर काढून टाकल्यावर ते घर – ती जागा जशी शांत होते तसे शरीरही उष्णतेच्या त्रासापासून बचावते.
गाडीची ज्याप्रमाणे आपण नियमित सर्विसिंग करतो त्याप्रमाणे शरीराची सुद्धा करण्यासाठी आयुर्वेद सांगतो.
त्यामुळे जसे गाडीची आयुष्य व कार्यक्षमता वाढते, तसेच शरीराचेही आहे. त्यामुळे दोष नाहीसे होऊन व्याधी / रोग होण्याच्या आधीच त्यांचा नायनाट होतो. जो नियमित शोधन – पंचकर्म करून घेत नाही, त्यास मधुमेह इ रोग होण्याची शक्यता जास्त असते असे सांगितले जाते ते खरेच आहे. जे लोक अशी शरीराची शुद्धी करून घेतात त्यांच्यापासून या व्याधी लांब राहातात. व निरोगी आयुष्य जगून शेवटी सुखाने देहत्याग करता येतो.
औषधांमध्ये मोरावळा, गुलकंद, गाईचे तूप / घृत इ यांचा वापर करू शकतो.
घरगुती उपायांमध्ये एक ग्लास पाणी व गुळ ( सुपारीएवढा ) घेणे, आवळा याचा रस वापर करावा, कांदा याचा उपयोग किंवा कांद्याचा रस घ्यावा, धन्याचे पाणी खडीसाखरेबरोबर घ्यावे.
फळांमध्ये डाळिंब हे अत्यंत उत्तम आहे. उंबर, कोहळा, आवळा, आमसूल / कोकम, सीताफळ इ फळे थंड परिणाम करणारी आहेत.
काही वनस्पतींच्या वापर करण्यानुसार उत्तम वनस्पती म्हणजे दुर्वा, कोरफड, वाला, चंदन, शतावरी, धने, कोथिंबीर, गुलाब, गुलाबपाणी इ होय.
बाह्योपाचारांमध्ये थंड पाण्याची अंघोळ करणे, चंदन – वाळा इ चा लेप लावणे, रात्री चांदण्यांमध्ये फिरणे, शीत / थंड जागी रहाणे, उन्हात अति न फिरणे इत्यादि.
आता काय करू नये किंवा प्रतिबंधात्मक उपाय काय करावे यासंबंधी साधारणपणे पाहू. कोणतीही गोष्ट न होण्यासाठी ‘ ती कोणत्या कारणांमुळे होते ती कारणे टाळणे ’ हा सर्वात सोपा उपाय असतो – यास आयुर्वेदात ‘ निदान परिवर्जन ’ म्हणतात. आपण वर ज्या कारणांमुळे उष्णता होते असे पाहिले ती कारणेच टाळणे हा त्यावरील सोपा उपाय होय.
आणखी जास्त माहिती किंवा सल्यासाठी जवळील आयुर्वेदिक वैद्य यांच्याशी संपर्क साधावा. किंवा लेखकही शंकासमाधानासाठी सदैव तयार आहेच.
For more……9869105594 , https://amrutaayurved.in/
Old articles available